Wednesday, 16 February 2011

आर्यभट्ट

(पाचव्या शतकात सूर्य- चंद्राचे वेध घेणारा महान भारतीय शास्त्रज्ञ)
इ. स. ४७६                                                              (भारत)
      भारताने आर्यभट्टाची जागतिक श्रेष्ठता कशी आजारामर केली?
भारतामध्ये पाचव्या शतकात एक अलौकिक खागोलशास्त्रज्ञ होऊन गेला, अशी सर्वसाधारण माहिती काही अभ्यासू भारतीयांना होती; परंतु आर्यभट्टाचे संशोधन किती महत्वाचे होते यासंबंधी बहुसंख्य भारतीय पूर्णपणे अंधारात होते. प्राचीन काळापासून भारतीय शास्त्रज्ञांची एक अद्वितीय परंपरा होती व आहे; पण सर्वसाधारण नागरिकांना या गोष्टींची काहीच कल्पना नसते! भारताने आपल्या पहिल्या उपग्रहाला ‘आर्यभट्ट’ हे नाव दिले, तेव्हा मात्र लोकांना याविषयी जाग आली व आर्यभट्टाने कोणत्या प्रकारचे शास्त्रीय प्रयोग केले व भारताचे नाव जागतिक शास्त्रज्ञांच्या मालिकेत कसे नेऊन बसविले हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. परंतु तरीही अशा जिज्ञासेचा पाठपुरावा करून संपूर्ण अथवा अंशतः माहिती मिळविण्याइतका उत्साह, तत्परता, किती भारतीयांमध्ये आहे, याचा उहापोह कारणाचे हे स्थळ नव्हे. मात्र खागोल विज्ञानात भारतीय नागरिक धार्मिक भावनेमुळे व वृथा अंधश्रद्धेमुळे जगाच्या मागे राहिले व अजूनही फार मोठ्या प्रमाणात आपला देश याबाबतीत अंधश्रद्धेने ग्रासलेला आहे हे कटू सत्य होय.
राहू वा केतू यांनी ग्रासल्यामुळे सूर्य, चंद्र यांना ग्रहण लागते या कल्पनेवर विश्वास असलेले लक्षावधी भारतीय नागरिक या ग्रहण काळात ‘ दे दान सुटे गिरान ’ या गर्जनांचा ऐकू घेणारा घोष हे काय दर्शवितात? मागे झालेल्या खग्रास सुर्यग्रहणापासून मुंबईसारख्या सुजान शहरातील लाखो सुबुद्ध नागरिकांना कड्या-कुलुपांच्या बंदोबस्तात कोंडून ठेवणाऱ्या धार्मिक नेत्याकडे पाहिले असता, आर्यभट्ट नावाच्या एका भारतीय शास्त्रज्ञाने १५०० वर्षापूर्वी भरसभेत सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यासंबंधी प्रात्यक्षिक दाखवून निरुपण केले व थोड्याच अवधीत आर्यभटीका हा ग्रंथही प्रकाशित केला यावर कोणाचा विश्वास बसेल का ?
पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची भ्रमण गती व परिभ्रमण गती यासंबंधी स्पष्ट काल्पना ज्याने त्या काळात मांडली, त्याचे नाव भारताच्या पहिल्या उपग्रहाला दिले जावे हे सर्वथैव उचित आहे.
भारताच्या सुवर्णयुगातील भौतिकशास्त्रीय संशोधन
आर्यभट्टाचा कार्यकाल म्हणजे इसविसनाचे पाचवे शतक, म्हणजेच भारतवर्षाचा सुवर्णयुगाचा काळ. या काळात भारताने आपल्या वैभवाचे तेज सर्व जगभर झळाळत ठेवले होते. समृद्धी, साधनसामग्री, तथा ज्ञानभांडार या गोष्टीत त्याकाळी भारत अग्रेसर होता. त्याकाळात भारतावर गुप्तांचे साम्राज्य होते. त्यांचा कारभार चोख असे. एवढेच नव्हे, तर त्या काळी भारतभर सुबत्ता नांदत होती. गुप्त घराण्यापैकी स्कंदगुप्ताच्या काळात आर्यभट्टाचा संशोधन काळ व्यतीत झाला. स्वतंत्र विचाराचा आर्यभट्ट भौतिक व खागोलशास्त्राचा अभ्यासू होता. इतर अंधश्रद्ध विद्वानांचा आपल्या मनावर मुळीच पगडा न पडू देता, दैनंदिन घटनांवर तो स्वतःच्या प्रज्ञेवर आधारित असा स्वतंत्र विचार करीत असे. अशा परिस्थितीत आर्यभट्टाच्या ज्ञानाची व प्रयोगशीलतेची कठोर परीक्षा घेण्यासारखा एक प्रसंग निर्माण झाला व आर्यभट्टाचे नाव सर्वोतोपरी झाले.
सुर्याग्रहाणाबद्दल वर्तवले गेलेले तत्कालीन भविष्य
स्कांद्गुप्ताच्या काळात त्यावर्षी सूर्यग्रहण होणार होते. या ग्रहणाबद्दल राजज्योतीशांनी भरसभेत चमत्कारिक भविष्य वर्तविले. त्यांचे म्हणणे होते की ‘ राजाचे ग्रह असे आहेत, की या वर्षीच्या सुर्याग्रहणामुळेच समस्त गुप्तसाम्राज्याच्या वैभवाला ग्रहण लागेल. हे ग्रहण स्कंद्गुप्त राजाने पाहू नये. गुप्तसाम्राज्याचा कोणतातरी प्रबळ शत्रू गुप्त साम्राज्य-सूर्यालाच ग्रासणार आहे. राजाने उपवास करून जपजाप्य व दानधर्म करावा. ’
या विचित्र व जाहीर भविष्यवाणीमुळे सर्व राजदरबार सुन्न झाला. सर्व राज्यभर उदासीनतेची छाया पसरली. प्रजाजनही जपजाप्यादी कर्मकांडाच्या मागे लागले. शत्रूचे आक्रमण टळावे म्हणून ठिकठिकाणी प्रार्थना होऊ लागल्या. सर्व लोक हवालदिल होऊन खिन्नतेचे श्वास सोडत होते. या साऱ्या खळबळीच्या व चिंतेच्या वातावरणात स्थितप्रज्ञ वृत्तीने व निश्चल मनाने वावरणारा एक विद्वान शास्त्रज्ञ होता, तो म्हणजेच महान गणिती आर्यभट्ट.
आर्यभट्टाने महाराज स्कंद्गुप्ताकडे आग्रह धरला की ग्रहणाची फळे पडताळून पाहण्यासाठी व कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी खगोल शास्त्रज्ञांची एक बैठक ताबडतोब भरवावी व सर्व साधक बाधक गोष्टींचा विचार करावा. प्रजाजन व अन्य विद्वान यांना दिलासा देण्यासाठी अरिष्ट-शांतर्थ्य चालले सर्व उपाय चालू ठेवण्यास अनुज्ञा देण्याचे त्याने राजस सुचवले. राजाने चोहीकडे दूत पाठवून वरील दोनी गोष्टीचे आयोजन केले.
प्रस्तुत सभेत आर्यभट्टाने सूर्यग्रहण व चंद्रग्रहण यांविषयी आपले खागोलशास्त्रावर आधारलेले विचार स्पष्टपणे मांडले व ग्रहने ही जरी अप्रिय व काहीशी धोकादायक असली, तरी खगोलशास्त्राच्या नियमामुळे होतात, कोणत्याही पापग्रहाच्या कोपामुळे अगर वक्रदृष्टीमुळे होत नाहीत, असे निश्चयपूर्वक प्रतिपादन केले. अर्थात त्याचे म्हणणे सर्व विद्वानांना मान्य झाले व सभाजन आनंदी झाले.
आर्यभट्टाचे प्रयोगसिद्ध प्रतिपादन   
ग्रहने म्हणजेच सूर्यग्रहणे अथवा चंद्रग्रहणे ही सृष्टीच्या नियमाने होतात, राहुने अगर केतूने सूर्य-चंद्राला ग्रासल्यामुळे होत नाहीत! ग्रहने एक प्रकारची संकटे आहेत; पण ती सूर्य-चंद्रावरची संकटे नाहीत, तर ती जीवसृष्टीवरची आहेत. विज्ञानाधिष्टीत अशा आचारांनी व विचारांनी ही संकटे दूर होतात. सूर्य, चंद्र व पृथ्वी यासंबंधी त्याकाळी असलेल्या सर्व कल्पना खोट्या आहेत असे आर्यभट्टाणे आमसभेत सांगितले. पृथ्वी ही चेंडूप्रमाणे गोल आहे. ती स्वतः भोवती फिरत आहे. तिचा आस दक्षिणोत्तर आहे. जो भाग सूर्याकडे असतो तो दिवस अनुभवतो व जो भाग सूर्याचा विरुद्ध दिशेला असतो तो रात्र अनुभवतो, म्हणूनच सूर्य पूर्वेकडे उगवत नसून आपण (म्हणजे पृथ्वी) पूर्वेकडे उगवतो व पश्चिमेकडे मावळतो. आपल्या म्हणजेच पृथ्वीच्या तुलनेत सूर्य स्थिर आहे. पृथ्वीच्या स्वतःभोवतालच्या परिभ्रमणामुळेच दिवस-रात्र होतात.
पृथ्वी स्वतःभोवती फिरत असतानाच सूर्याभोवतीही फिरते; परंतु आपणाला मात्र सुर्यच सरकतो असे वाटते. पृथ्वीच्या मधोमध एक कटिबंध आहे अशी कल्पना केली, तर या विषुववृत्तावरून अथवा कटिबंधावरून सूर्य वर्षातून दोनदा जातो असे दिसते आणि हा काळही निश्चित आहे.
तत्कालीन विद्वानांचा जळफळाट व राजाचा प्रतिवाद
      आर्यभट्टाचे वरील निवेदन तत्कालीन विद्वानांनी अमान्य केले. ‘ अशा प्रकारच्या पाखंडी व पापी विचारामुळेच ग्रहनासारखी अरिष्टे कोसळतात !’ असे ते राजाला सांगू लागले, ‘आर्यभट्टासारख्या पाप्याच्या नादी स्कंद्गुप्त राजाने लागणे म्हणजे सर्वनाश ओढवून घेण्यासारखे आहे !’ असे ते म्हणाले. आर्यभट्ट अहंकारी असून तो स्वतःसकट सर्व गुप्त साम्राज्य विलयाला नेणार आहे, तेव्हा राजाने वेळीच सावध व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
      आर्यभट्टाच्या विज्ञानाची राजाला सर्वथैव खात्री होतीच; पण त्याच्या प्रामाणिकपणाबद्दलही राजाला नितांत विश्वास होता. अन्य विद्वानांच्या विधानामधला पोकळपणा राजाला आधीच कळून चुकला होता. त्यांना एकदम गप्प न करता तो त्यांना म्हणाला – ‘ आपण सर्व दशग्रंथी विद्वान आहात. आपण अनेक अनुभवातून तावून-सुलाखून निघाला आहात, तेव्हा असा आततायीपणा आपणास शोभून दिसत नाही. ’
      ‘ वर्षानुवर्षे प्रयोगात घालवून व प्रत्यक्ष प्रमाण दाखवून महान गणिती व विचारवंत ठरलेल्या अशा आर्यभट्टाच्या सिद्धांताचा आपण केवळ अंदाजाच्या बळावर अपमान करीत आहात, हे आपले औद्धत्य नव्हे काय? सूर्य-चंद्रासारख्या प्रतापी ग्रहावर अद्यापि काही संकटे येतच असली तर त्याचे निवारण जपजाप्यासारख्या आणि दानासारख्या क्षुल्लक उपायांनी करता येईल, ही आपली कल्पना केवळ हास्यास्पद आहे. त्यापेक्षा या थोर शास्त्रज्ञाचे विचार निट समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आर्यभट्टाची विचारसरणी तुम्ही स्वीकारली, तर या खगोल विषयात कितीतरी मौलिक विचारांची भर तुम्हीसुद्धा टाकू शकाल व सध्या तुमच्या मनात असलेल्या परंपरागत व अपरिचित कल्पना किती फोल आहेत हे तुमचे तुम्हालाच समजेल. जर आपल्या प्रयत्नांनी आपण दूरस्थ ग्रहांचे बरे-वाईट करू शकत नाही, तर ते ठराविक मार्ग आक्रमिणारे ग्रह तरी मानवासारख्या सामान्य प्राण्याचे भलेबुरे का बरे चिंतीतील? तुम्हीच निट विचार करून पहा, म्हणजे या असामान्य शास्त्रज्ञाने संशोधनाचे केवढे मोठे दालन तुमच्यासाठी उघडे करून दिले आहे हे तुम्हाला समजेल. ’ स्कंदगुप्ताचे हे उद्गार ऐकून सभेतील विद्वान निरुत्तर झाले.
       आर्यभट्टाचे प्रात्यक्षिक व निवेदन
      सभेचे स्वरूप अशा रीतीने पालटले. त्यानंतर आर्यभट्टाणे एक दिवा, एक मोठे फळ व एक छोटे फळ आणि लांब दाभण यांच्या सहाय्याने सूर्याचा प्रकाश, पृथ्वीचे भ्रमण व परिभ्रमण यांचे दर्शन घडवून, सूर्यग्रहण व चंद्रग्रहण पृथ्वीवर कसे दिसते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. हे प्रत्यक्ष प्रमाण बघितल्यावर सर्व सभाजन अवाक्‌ झाले.
      शुचिर्भूतता, जपजाप्य वगैरे गोष्टी किती निरुपयोगी आहेत हे सभाजानांना आता समजले. सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश हे आरोग्यकारक आहेत. जेव्हा ग्रहण घडते तेव्हा किरणांत बदल घडतो, वनस्पती मलूल होतात व आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, म्हणून स्वच्छता व इतर आरोग्यरक्षक मार्गांचा अवलंब करणे कसे आवश्यक आहे हेही आर्यभट्टाने समजून सांगितले. या काळात स्वैरपणा न करता मनःशांतीचा अवलंब व प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजेला अनुरूप उत्तम आचार याचे महत्व त्याने पटवून दिले. आर्यभट्टाचे हे विवरण व सूचना सर्वानांच पसंत पडल्या. त्यानंतर राजाने व सर्व विद्वानांनी मानचिन्हे देऊन त्याचा यथोचित गौरव केलं व त्याला ‘ विज्ञानमहर्षी ’ असा बहुमानाचा किताब अर्पण केला.
      ‘आर्यभटीय’ या ग्रंथाचे प्रकाशन
      आपल्या संशोधनाचे सार, निरीक्षण आणि प्रयोग यांवरून काढलेली अनुमाने आर्यभट्टाने आपल्या ‘आर्यभटीय’ या ग्रंथाद्वारे प्रकाशित केली. ग्रंथप्रकाशनासाठी राजसभेमध्ये एक मोठा सत्कार समारंभ स्कंद्गुप्त राजाने आयोजित केलं होतं. या ग्रंथात गणित व खगोलविज्ञान विषद केले आहे. या ग्रंथाचे चार विभाग वा पदे आहेत, ती पुढीलप्रमाणे –
१)      दशगीतिका-पद  - दहा श्लोकांद्वारे मोठमोठ्या संख्यांचे वर्णन.
२)      गणित पद – यात ३३ श्लोक असून, गणितशास्त्रातील आर्यभट्टाचे प्रगत विचार यांमध्ये समजावून दिले आहेत.
३)      काळ-क्रिया पद – यांमध्ये २५ श्लोक असून, त्यामध्ये कालासंबंधी माहिती आहे.
४)      वर्तुळ-पद – या विभागात गोल आणि वर्तुळ विषयक ५० श्लोकांचा समावेश आहे.
अंक मांडण्याकरिता अक्षर – पद्धतीचा आर्यभट्टाने पुरस्कार केला. ही पद्धत तितकी मान्यता पावली नसली तरी आकड्यांची पट, दसपट व घात मांडण्यासाठी अक्षरांचा कसा उपयोग करता येईल, हे या ग्रंथाच्या दश्गीतीकेमध्ये दाखविले आहे.
उदाहरणार्थ – चंद्राचे पृथ्वीभोवातालचे महायुग परिभ्रमण हे ५,७७,५३,३३६ इतक्या वर्षांचे मानले, तर ते अक्षरपद्धतीत खा गि यि पु सु छे ले असे मांडता येईल.
   आर्यभट्टाच्या तर्कशुद्ध विचारसरणीवर लोक फार प्रसन्न झाले. अक्षरपद्धतीचा उपयोग सांकेतिक संदेशासाठी करता येईल. अक्षरपद्धतीने अंक व संख्या मांडण्याची रीत जरा गुंतागुंतीची असल्यामुळे ती तिथे समजावून देण्याचा मोह टाळला आहे. क्लिष्ट रचना पद्धतीमुळ बहुदा या अक्षरांक-लेखन-संकल्पाला लोकप्रीयता लाभलेली नसावी.
      बीजगणित या तत्कालीन नवीन वाटणाऱ्या गणितशाखेचा व अपूर्णांक दशांश पद्धतीने संख्या मांडण्याच्या कल्पनेच्या पायंडा आर्यभट्टानी घातला. एवढेच नव्हे, तर काटकोन-त्रिकोनाबाबतचा सिद्धांतही त्यांनी लोकांपुढे ठेवला. आर्यभट्टाने केलेल्या कार्यावर आधारलेले अन्य सिद्धांत पुढे दिले आहेत-
·         चंद्र स्वयंप्रकाशी नसून, सूर्याचा प्रकाश परावर्तीत करतो.
·         पृथ्वीचा आस कलता असल्यामुळे सूर्याभोवती पृथ्वी फिरताना वर्षाचे नियमितपणे उत्तरायण व दक्षिणायन असे भाग पडतात.
·         आपणास दिसू शकत असलेल्या ग्रहाच्या गतीचा अभ्यास शक्य आहे.
·         भूमितीचा अधिक अभ्यास केला असता अनेक नवी प्रमये मांडता येतात.
·         ‘पाय’ या वर्तुळाच्या संदर्भात येणाऱ्या स्थिरांकाचे मूल्य चार दशांश चिन्हापर्यंत काढता येते. ते म्हणजे ३.१४६. आर्यभट्टाच्या ग्रंथाचे रुपांतर अरबी भाषेतही झाले. तत्कालीन ग्रीक शास्त्रज्ञांपेक्षा आर्यभट्टाचे संशोधन अधिक महत्वाचे मानले गेले. अशा या गणित व खागोलाशास्त्राज्ञाच्या नावे भारताने ‘आर्यभट्ट’ हा उपग्रह सोडला हे सर्वथैव योग्यच नव्हे का?

7 comments:

  1. Mala aplya likhanamule barich mahiti milali. apn he kam pudhe tevdhaych usthane karave tasech jastit jast mahiti puravanycha prayatna karava.
    {I really appreciate your work. i wish you will continue your work with same enthusiasm. please try to provide maximum details. }

    ReplyDelete
  2. भारत भूमीवर जन्मल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  3. Replies
    1. धन्यवाद. छान माहिती

      Delete
  4. धन्यवाद छान माहिती

    ReplyDelete
  5. धन्यवाद. छान माहिती

    ReplyDelete